भावनिक आणि प्रतीकात्मक वीण - 'संसद'
भावनिक आणि प्रतीकात्मक वीण - 'संसद'
भारताच्या लोकशाहीचा सर्वोच्च मंच म्हणजे संसद. पण हीच संसद, जिथं देशातील मूलभूत प्रश्न चर्चिले जावेत, निर्णय व्हावेत, ती अनेकदा केवळ गदारोळाचा, आरोप-प्रत्यारोपांचा आणि आक्षेपार्ह टीकेचा अखाडा बनते. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या प्रश्नांसाठी उभं राहावं, त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, हे अपेक्षित असतं. पण वास्तवात आपल्यासमोर जे उभं राहतं ते राजकारणाचं एक विकृत, दिशाहीन आणि धूसर चित्र असतं. अशा काळात, 'संसद' या लघुकादंबरीतून योगीराज वाघमारे यांनी एक अनोखा दृष्टिकोन आपल्या समोर मांडला आहे. गावगाड्यातील कट्ट्यावर रोज भरणारी "जनतेची संसद".
ही लघुकादंबरी केवळ एका गावकथेसारखी नसून, ती ग्रामीण स्त्रीजीवनाचं संवेदनशील चित्रण करताना, सामाजिक बदलासाठी मनोमन झगडणाऱ्या स्त्रियांच्या अंतरंगाची सखोल मांडणी करते. ‘नांदुरकी’ या गावातील ‘भीमवाडी’तला एक साधा कट्टा. जेथे निवांतपणे म्हाताऱ्या बायका जमतात, चर्चा करतात, अनुभव शेअर करतात. हा कट्टा म्हणजेच या कथेची ‘संसद’ होय. देशाच्या उच्चसभागृहात न घडणारी चर्चा या कट्ट्यावर जीवंत होते, तीही अधिक प्रामाणिक, अधिक समर्पक आणि जनतेच्या मनाच्या नादी लागणारी!
या कथानकातली मुख्य व्यक्तिरेखा आहे ‘जना’ अंगणवाडीतील मदतनीस. ती एक विधवा आहे. तिच्या आयुष्यातील दुःख, शोक, एकटेपणा तिला गाठतो, पण ती खचत नाही. ती दुःख झटकून चिमुकल्या बालकांत रमते, म्हाताऱ्या बायकांना समजून घेते, त्यांची सेवा करते, त्यांचं मन हलकं करत राहते. ‘जना’ ही व्यक्तीरेखा एका स्त्रीच्या अंतर्गत संघर्षाचं आणि सामाजिक सहवासाचं प्रतीक ठरते. ती आजच्या ग्रामीण स्त्रीला केवळ जगण्याचं नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचं बळ देते.
जना ही शोषित, उपेक्षित स्त्री असूनही, ती कोणत्याही थेट क्रांतीचा नारा देत नाही. तिच्या कृतीतून, मायेच्या सहवासातून, आणि संवादातून एक सशक्त स्त्रीचं चित्र उभं राहतं. ती स्वतः दु:खातून गेलेली असल्याने इतरांचं दु:ख समजून घेते आणि त्यांना आधार देते.
या लघुकादंबरीतील सर्व पात्रं, विशेषतः आजी झालेल्या म्हाताऱ्या बायका, समाजाच्या अनेक अंगांना स्पर्श करतात. त्यांचं बोलणं, त्यांचे अनुभव, त्यांची जीवनदृष्टी हे सर्व गावातील स्त्रीजीवनाचं दस्तऐवजीकरण म्हणता येईल. त्यांच्या कथा केवळ त्यांच्या नसतात; त्या सासू-सुनांच्या, लेक-लेकाच्या, गावाच्या आणि एकूणच स्त्रीच्या असतात. एका ‘कट्ट्या’वरून त्यांची जीवतत्त्वं मांडली जातात, ती भारताच्या सर्वसामान्य ग्रामीण स्त्रीचा आवाज ठरतो.
तिथं कुणी राजकारण शिकवत नाही, पण राजकारणाची खरी-खुरी समज दिली जाते. पंतप्रधान असो किंवा सरपंच, प्रत्येकाचा शहाणपणा तिथं कापला जातो. तेही आदर ठेवून, अनुभवाच्या कसोटीतून.
या लघुकादंबरीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामीण लोकशाहीचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व. संसदेमधील गदारोळात जे हरवतं, ते इथं पुन्हा सापडतं. गावातील पार, कट्टा, सावलीतली जागा या सगळ्या ठिकाणी ग्रामीण स्त्रिया केवळ संवाद करत नाहीत, तर देश, समाज, कुटुंब, मूल्य आणि जीवन यांचा अर्थ लावत राहतात.
तिथे ‘म्हाताऱ्या’ म्हणजे ‘विसरलेल्या’ किंवा ‘उपेक्षित’ स्त्रिया नाहीत. त्या समाजाचं ज्ञानकेंद्र आहेत. त्यांचा अनुभव हा नव्या पिढीच्या उज्वल भविष्याचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या गोष्टींतून, आठवणींतून, हसण्यांतून आणि डोळ्यातल्या पाण्यातूनही जे सांगितलं जातं तेच तर खऱ्या अर्थाने ‘संसद’ आहे.
‘संसद’ ही केवळ एक कथा नाही; ती स्त्रियांच्या आयुष्यातून उमटलेला भावनिक सूर आहे. प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक संवादातून, आणि प्रत्येक पात्राच्या अस्तित्वातून लेखकाने जणू एका जिवंत संसदेला आकार दिला आहे. जिथे चर्चा आहेत, मतभेद आहेत, पण शेवटी आहे ती जाणीव.
ही संसद न केवळ ग्रामविकासाची, तर स्त्रीमनाच्या उलगडण्याची प्रक्रिया दर्शवते. ती बाईला एक सन्मान देणारी आणि तिच्या ‘मौन’ आवाजाला बोलतं करणारी आहे.
आजच्या काळात, जिथं सोशल मीडियावर, टीव्ही डिबेट्समध्ये ‘चर्चा’चा अर्थ गोंगाट बनलाय, तिथं 'संसद' सारखी लघुकादंबरी आपल्याला एक वेगळा आरसा दाखवते. शांततेतून होणारी संवादाची ताकद दाखवते. कट्ट्यावरच्या हसऱ्या, कोसळणाऱ्या आणि तग धरून राहिलेल्या बायका देशाच्या सामाजिक संसदेत खऱ्या अर्थानं भाग घेताना दिसतात.
योगीराज वाघमारे यांनी लिहिलेली 'संसद' ही लघुकादंबरी म्हणजे एक सजीव संवाद आहे. ग्रामीण भारताच्या खऱ्या लोकशाहीचा, स्त्रीच्या अनुभवविश्वाचा आणि मानवी समजुतीचा. अशा साहित्यातूनच आपल्याला लोकशाहीचा, समाजाचा आणि संस्कृतीचा खरा चेहरा पाहायला मिळतो.
ही लघुकादंबरी लवकरच dibho.com या आॅनलाईन ईबुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा.
Comments
Post a Comment