'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

'धम्मपद' - अंतःकरणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

“मन हेच सर्व गोष्टींचे मूळ आहे” — एका साध्या वाक्यात बुद्धांनी सांगितलेली ही जगण्याची दिशा, आजच्या जगात अधिकच अर्थपूर्ण वाटते. माणसाच्या अंतर्मनातील हालचाली, त्याच्या भावना, इच्छा, आकांक्षा, राग, लोभ, मोह या साऱ्यांचे मूळ मनामध्ये दडलेले आहे. आणि या मनालाच जर योग्य दिशेने घडवले, तर आयुष्य सुसंस्कृत, सुसंयमित आणि समाधानी होऊ शकते. "धम्मपद गाथा आणि कथा भाग १" या ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध होत असताना, हा विचार पुन्हा एकदा मनात रुंजी घालतो.

डी. एल. कांबळे लिखित ‘धम्मपद गाथा आणि कथा’ हा ग्रंथ केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही. तो जीवनाच्या कंगोऱ्यांवर प्रकाश टाकणारा एक दीपस्तंभ आहे. तिसऱ्या आवृत्तीच्या दोन हजार प्रतींना मिळालेला भरघोस प्रतिसाद म्हणजेच लोकांच्या मनात या ग्रंथाबद्दल असलेली आत्मीयता आणि विश्वास. गाथांबरोबर आलेल्या कथा, मराठीतील काव्यरूप अर्थ, गद्यार्थ, शब्दार्थ, आणि स्पष्ट स्पष्टीकरण हे सारे या ग्रंथाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. हा केवळ धर्माचं भाष्य करणारा ग्रंथ नाही, तर तो जीवनाच्या तत्त्वज्ञानाचं सुलभ भाष्य करणारा ‘धम्मदूत’ आहे.

बुद्धांच्या प्रत्येक गाथेमागे एक अनुभव आहे, एक कथा आहे, आणि त्या कथेच्या पाठीमागे आहे जगण्यातून आलेली प्रगल्भता. ‘धम्मपद’ हे केवळ गाथांचे संकलन नाही, तर ते मनाचे आरसे आहेत. त्या आरशात प्रत्येक माणसाने स्वतःचे प्रतिबिंब पाहावे, त्यातील विकार ओळखावेत आणि त्या विकारांवर मात करण्याचा मार्ग शोधावा, हेच या ग्रंथाचं सार आहे.

बुद्धांनी सांगितले की, दुःखाचा खरा उगम दुसऱ्यात नसतो, तो आपल्या मनात असतो. आपलं मन जर रागाने, द्वेषाने, मोहाने भरलेलं असेल, तर आपण दुसऱ्याला दुःख द्यायला जातो आणि त्याच वेळी आपण स्वतःमध्ये दुःखाचं बीज पेरतो. ही तत्त्वज्ञानाची भाषा वाटत नाही, ती अनुभवातून आलेली एक सत्यशोधक जाणीव आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे तो म्हणजे मन. मनुष्याला केवळ शरीरपुरते पोषण नको, त्याला मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पोषणही हवे. आणि हे पोषण देणारे विचार म्हणजे बुद्धांचे विचार, हे बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या मते, समाज बदलायचा असेल, तर माणसाच्या मनाची मशागत करावी लागेल. क्रांती केवळ राजकीय किंवा सामाजिक नसते; ती आधी अंतःकरणात घडावी लागते. हीच क्रांती बुद्धांनी घडवून दाखवली.

बाबासाहेबांचे विचार हे केवळ बौद्धधम्माचा गौरव करण्यापुरते मर्यादित नाहीत. ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये असलेल्या वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोनाकडे लक्ष वेधतात. “बुद्धत्व प्राप्त करणे हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे” हा बाबासाहेबांचा संदेश केवळ प्रेरणादायक नाही, तो क्रांतिकारक आहे. कारण तो माणसाला त्याच्या मानसिक गुलामीतून बाहेर काढतो, आत्मप्रबोधनाकडे घेऊन जातो.

दुःख माणसाच्या जीवनाचा अनिवार्य भाग आहे. प्रत्येक माणूस आपल्या पातळीवर, आपल्या संदर्भात कोणत्यातरी स्वरूपाचं दुःख अनुभवत असतो. पण हे दुःख का आहे? कोणामुळे आहे? आणि त्यावर उपाय काय?

या प्रश्नांवर अनेक विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने विचार केले. मार्क्स म्हणाला, दुःखाची मुळे ही समाजाच्या आर्थिक रचनेत दडलेली आहेत. श्रीमंत-गरीब यातील फरक, संपत्तीचे विषम वितरण, मालकी हक्कांची असमानता हीच माणसाच्या दुःखाची खरी मुळे आहेत. म्हणूनच मार्क्सला धर्म हा अफू वाटतो. कारण धर्म माणसाला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी केवळ धीर देतो, पण परिस्थिती बदलण्याचे प्रेरणास्थान देत नाही. धर्म म्हणजे व्यवस्थेने लावलेला पट्टा, जो डोळ्यावर बांधला जातो.

मार्क्सच्या या विचाराला बुद्धदृष्टिकोनातून विरोध करावा लागतो. बुद्ध धर्म ही अफू नाही, तर मनाची शुद्धी आहे. बुद्ध धम्म हे भोगापासून दूर जाण्याचं नाही, तर भोगाच्या आंधळेपणातून मुक्त होण्याचं साधन आहे. तो आत्मपरीक्षण, शांती आणि करुणेच्या मार्गाने माणसाला सामाजिक नव्हे तर आत्मिक क्रांतीकडे नेतो. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं “ज्या मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्हटलं, त्याने बुद्धाचा धम्म अभ्यासलेला नाही.”

मार्क्सनंतर जर आपण फ्रॉइडकडे पाहिलं, तर त्याचं दुःखाचं विश्लेषण आणखी वेगळं आहे. फ्रॉइड म्हणतो, माणूस स्वतःच्याच अंतर्गत इच्छांनी, विशेषतः लैंगिक इच्छांनी ग्रासलेला आहे. समाज या इच्छांना नाकारतो, दडपतो, नियंत्रित करतो. आणि त्यामुळे माणूस कधीही खरा सुखी होऊ शकत नाही. त्याच्या मना-मना मागे दडलेली ही असंख्य अपूर्ण कामे, आकांक्षा त्याच्या दुःखाची बीजं बनतात. माणूस हा अंतर्बाह्य संघर्षात अडकतो आणि अशांत राहतो.

मात्र बुद्ध म्हणतात, तुमच्या दुःखाचं मूळ ना बाहेर आहे, ना समाजात आहे, ना शरीरात आहे. ते तुमच्या ‘मनात’ आहे. “मन हेच सर्व गोष्टींचे मुळ आहे” हे वचन म्हणजे या त्रिसूत्रीतील सर्वात खोल सत्य. तुम्ही दुसऱ्याला दुःख द्यायचा विचार करता, त्याच क्षणी तुम्ही स्वतःलाच दुःख देणं सुरू करता. हे निरीक्षण जेवढं साधं वाटतं, तेवढंच खोल आहे. बुद्धांच्या क्रांतीचा आधार हा बाह्य संघर्ष नव्हता, तर आत्मसंघर्ष होता.

इतिहासातील बहुतांश क्रांत्या या बाह्य व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या होत्या. सत्ताकेंद्र, संपत्ती, धर्मव्यवस्था किंवा सामाजिक रचना यांना उलथवून टाकण्याचा प्रयत्न त्या करतात. पण त्यातून नवीन सत्ताकेंद्र उभं राहतं, नवीन वर्ग तयार होतो, आणि माणसाचे दुःख कायम राहतं. मार्क्सवादाच्या क्रांतीतूनही रशियात वर्गभेद पूर्णतः मिटले नाहीत. एक वर्ग गेला, दुसरा आला. दुःखाची रचना बदलली, पण त्याचं अस्तित्व तसंच राहिलं.

पण बुद्धांची क्रांती वेगळी आहे. ती केवळ सामाजिक नाही, ती आध्यात्मिक आहे. ती केवळ बाह्य रूप बदलत नाही, ती अंतरात्मा घडवते. बुद्ध म्हणतात, “दुसऱ्याला दुःख देणं म्हणजे स्वतःलाच विष देणं.” जेव्हा आपण राग, द्वेष, सूड, मोह या विकारांनी भरतो, तेव्हा आपणच आपल्या मनावर विष शिंपतो. आणि हाच विषारी अनुभव पुढे आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकतो.

धम्मपदातील गाथांमधून सतत एकच संदेश ठळकपणे समोर येतो, “तुमचं भवितव्य हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.” एक व्यक्ती कोणाला वैराने उत्तर देते, क्रोधात वागते, सूड घेते, तेव्हा ती फक्त क्षणिक प्रतिक्रिया देत नसते तर ती आपल्या आयुष्यात दुःखाची प्रक्रिया सुरू करत असते.

बुद्ध म्हणतात, “जसं बैलाच्या मागे गाडीचं चाक सतत लागून असतं, तसं विकारी मनाच्या मागे दुःख सतत लागून असतं.” ही प्रतिमा इतकी बोलकी आहे की ती मनात खोलवर बसते. जर मनात क्रोध आहे, तर तो आधी आपल्याला जाळतो. जर द्वेष आहे, तर तो आधी आपली शांतता हिरावून घेतो. म्हणून बुद्ध उपदेश करतात, "शिव्यांचा स्वीकार करू नका. त्या परत पाठवा. कारण देणं दुसऱ्याच्या हातात असेल, पण घेणं तुमच्या हातात आहे."

बुद्धांचं एक वचन आहे. “न हि वेरेण वेराणि, सम्मन्तीध कुदाचनं, अवेरेण च सम्मन्ति, एसा धम्मो सनन्तनो” म्हणजेच वैराने कधीही वैर संपत नाही. मैत्रीनेच वैर संपतं. हा नियम शाश्वत आहे.

या एका वाक्यात संपूर्ण मानवधर्म सामावलेला आहे. माणसाला माणसाशी जोडणारा एकमेव धागा म्हणजे करुणा. द्वेष, सूड, हिंसा, फसवणूक या साऱ्या गोष्टी क्षणिक विजय देतील, पण आयुष्यभराचं दुःख मागे ठेवून जातील. पण जर आपण अवैराने उत्तर दिलं, तर मनाला शांती मिळते. ही शांतीच खरी संपत्ती आहे.

धम्मपद हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तो जगण्याची प्रयोगशाळा आहे. या गाथा वाचणं म्हणजे केवळ तत्त्वज्ञान समजून घेणं नव्हे, तर आपल्या मनाच्या प्रत्येक हालचालीकडे जागरूकपणे पाहणं. यातील कथा केवळ मनोरंजक नाहीत; त्या मूल्यांची बीजं आपल्या अंतर्मनात पेरतात.

उदाहरणार्थ, एक कथा आहे एका स्त्रीची – ‘कोटिसुप्प’. तिचा मुलगा मरतो. ती वेडी होऊन आपल्या बाळाचं प्रेत उराशी धरून सर्वत्र जात राहते – “माझ्या मुलाला वाचवा.” कोणी सांगतं, “बुद्धांकडे जा.” ती बुद्धांकडे जाते. बुद्ध तिला म्हणतात, “माझ्या गोष्टी ऐकायचीय का? तर आधी अशा घरातून मोहरी घेऊन ये, जिथं मृत्यूचं सावट नसलं.” ती शोधू लागते… पण असं घर कुठेच सापडत नाही. अखेरीस तिच्या डोळ्यांत सत्य उतरायला लागतं – मृत्यू ही सार्वत्रिक, अनिवार्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे.

ही कथा सांगते, की शोकामध्ये अडकून न राहता, दुःखाच्या अनुभवातून समज निर्माण झाली पाहिजे. आणि ही समज म्हणजेच बुद्धाचा मार्ग. प्रत्येक दुःख अनुभवताना, त्यातून काही शिकणं हीच खरी क्रांती आहे.

धम्मपदामधील गाथा म्हणजे मन:शास्त्र, तत्त्वज्ञान आणि नैतिक शिक्षण यांचं संपूर्ण मिश्रण आहे. यात सगळीकडे “स्वतःकडे पाहा, आत्मपरीक्षण करा, आणि शांत राहा” हाच संदेश आहे. "आपणच आपले रक्षण करू शकतो; दुसरं कोणी नाही. आपलं रक्षण आपण केल्यावर, आपणच मुक्त होतो." ही गाथा म्हणजे आत्मनिर्भरतेचा आदर्श आहे.

आजच्या काळात, जिथं सोशल मीडियाच्या गोंगाटात मौन हरवून गेलंय, जिथं सतत दुसऱ्यांशी तुलना करत आपण आपल्याच मूल्यांपासून दूर जातोय तिथं धम्मपद हे एक सावरणारं, आधार देणारं आणि मार्ग दाखवणारं टोक आहे. जिथं यशाचं मोजमाप प्रसिद्धीने होतं, तिथं धम्मपद सांगतं “मनाचं स्थैर्य हेच खरे यश आहे.”

बुद्ध विचार काळाच्या पलिकडे पोचतो कारण तो माणसाच्या मूळ प्रश्नांना भिडतो. पैसा, सत्ता, नाव, प्रतिष्ठा यांचा क्षणिक आनंद असतो. पण जेव्हा रात्र शांत होते आणि माणूस स्वतःशी एकटा राहतो तेव्हा त्याचं खरं दुःख डोकं वर काढतं. बुद्ध हे दुःख टाळायला शिकवत नाहीत, ते त्याच्या मुळाशी जाणं शिकवतात.

धम्मपदाच्या गाथा सांगतात, रागाने बोलणं सहज आहे, पण मौन राखून प्रेमाने उत्तर देणं ही खरी ताकद आहे. द्वेषानं उभा राहणं सोपं आहे, पण करुणेने झुकणं ही खरी माणुसकी आहे. आणि म्हणूनच बुद्ध विचार क्रांतीची भाषा बोलतो, पण त्यात रक्त नाही. शांती आहे.

धम्मपदाच्या गाथा म्हणजे अंतर्मनातला आरसा आहेत. प्रत्येक वाचनात आपल्याला नवं काही दिसतं. आपलीच नवी बाजू उलगडते. आणि म्हणून या गाथा केवळ वाचायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.

धम्मपद वाचणं म्हणजे जगण्याकडे पाहण्याची दृष्टी मिळवणं. दुःखाला स्वीकारणं, रागावर विजय मिळवणं, क्षणभंगुर गोष्टींमध्ये सत्य न शोधता, अंतर्मनातल्या शांततेचा अनुभव घेणं. हा अनुभव शब्दांत मावत नाही. तो अंतःप्रेरणेनेच उमजतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला, तेव्हा तो केवळ धर्मांतरण नव्हतं, ती होती चैतन्याची क्रांती. त्यांना बुद्धांचे विचार सामाजिक परिवर्तनासाठी उपयोगी वाटले कारण बुद्धाने माणसाला सत्तेच्या नाही, मुक्तीच्या वाटेवर नेलं.

आणि म्हणून, ‘धम्मपद गाथा आणि कथा’ केवळ एक ग्रंथ नाही, तो आहे एक दिशादर्शक दीप. जो काळोख्या दुःखांतूनही वाट दाखवतो, सांगतो “जग बदलायचं असेल, तर स्वतःपासून सुरुवात कर.”

हा ग्रंथ dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे. अवश्य वाचा. 

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले