‘गोफण’- संवेदनशीलतेचा एक सुंदर आविष्कार..

‘गोफण’- संवेदनशीलतेचा एक सुंदर आविष्कार.. 

काव्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर ती असते हृदयाची धग, जीवनानुभवांची झळ, आणि अंतर्मनातून ओसंडून वाहणाऱ्या भावनांची अमृतधारा. अशाच एका धगधगत्या अनुभवातून साकारलेला काव्यसंग्रह म्हणजे 'गोफण'. अँडव्होकेट राजकुमार उदगांवे यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. हा काव्यसंग्रह त्यांच्या स्वतःच्या जीवनप्रवासाची, भावनिकतेची आणि सामाजिक जाणिवेची साक्ष देणारा आहे.

एक वकील म्हणजे नियम, तर्क, युक्तिवाद, व्यस्तता, आणि कोरडेपणा. परंतु त्याच कोरड्या वाळवंटात जणू जाणीवेचा झरा फुटतो आणि राजकुमार उदगांवे या कवीची कविता जन्म घेते. गरिबीतून आलेल्या, वेळेच्या दारिद्र्यात अडकलेल्या कवीच्या मनात कविता हा फक्त छंद नव्हता तर ती होती एक आत्मशोधाची वाट, जीवनाला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची भाषा.

"सभ्यतेच्या नावाखाली स्वतःवर किती बंधनं घालायची?" या एकाच प्रश्नाने असंख्य संवेदनशील मनं छिन्नविछिन्न झाली आहेत. गरिबीच्या पार्श्वभूमीवर सभ्यपणाचा मुखवटा घालून फिरण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांच्यासाठी जगणं हे ‘सहन करणं’ ठरतं. अश्याच एका टोकाच्या मनःस्थितीत कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांची शालेय जीवनात वाचलेली कविता कवीच्या मनात उमटते आणि आतून नवे बळ मिळते.

तरीही कर्तव्याकडे सदा दक्ष राहण्याच्या वृत्तीमुळे मनातील भावना अनेकदा गाडल्या जातात. ‘गोफण’ ही त्या दाबल्या गेलेल्या भावनांच्या उद्रेकाची गोष्ट आहे. ती गोष्ट आहे, एका सुशिक्षित, व्यावसायिक माणसाने स्वतःच्याच मनावर केलेल्या फुंकरांची. या फुंकरातूनच कवितेच्या वेलीवर नाजूक कळ्या फुटतात, आणि त्याचा ‘फुलोरा’ होतो.

‘फुलोरा’ या पहिल्या काव्यसंग्रहातूनच त्यांनी रसिकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. ‘फुलोरा’ हे फुलण्याचे प्रतीक होते. एका कवितारूपी वेलीवर उमलणाऱ्या भावकळ्यांचे. तर त्याच ऊर्जेने साकारलेली ‘गोफण’ ही मात्र वेगळी आहे. ही झेलून घेणारी, प्रतिकार करणारी, आवाज उठवणारी आहे. गोफण म्हणजे यंत्रणा. जी सत्याची गोष्ट दगडासारखी फेकते आणि व्यवस्थेच्या मुखवट्यावर आदळते.

‘गोफण’ या संग्रहात राजकुमार उदगांवे यांच्या कविता सामाजिक वास्तवाशी निगडीत असल्या तरी त्या बोचत नाहीत. त्या अनुभवांच्या, संवेदनांच्या आणि जखमांवर ठेवलेल्या फुंकरांच्या आवाज आहेत. मराठी भाषेच्या गंधाळलेल्या शब्दांनी सजलेल्या या कवितांमध्ये, आत्मसाक्षात्कार आहे. संघर्षाचं सौंदर्य आहे. वेदनांचं कवच आहे आणि शब्दांची धार आहे.

मराठी साहित्यातील अजरामर कविंनी आपला स्वतंत्र सुवर्णमार्ग तयार केला. गोफणमधील कविता त्या मार्गावरून निघालेल्या एखाद्या पाउलवाटेवरून चालणाऱ्या पथिकासारख्या वाटतात. त्या नव्या नाहीत, पण नवतेचा स्पर्श घेऊन आलेल्या आहेत. त्या विद्रोही नाहीत, पण विवेकी आहेत. त्या आक्रोश करत नाहीत, पण अंतर्मनातील दुःखाची सौम्य, सुसंस्कृत मांडणी करतात.

‘गोफण’ या शब्दाचा अर्थ अनेकविध आहे. बालपणीचा खेळ, लढाईचं साधन, तर कधी मूकपणे विरोध व्यक्त करण्याचं हत्यार. या संग्रहात ‘गोफण’ ही प्रत्येकाच्या भावजीवनातील एखाद्या संघर्षाचे प्रतिक आहे. प्रत्येक कविता म्हणजे त्या गोफणीतील एक शब्दशर आहे. जो व्यवस्थेच्या भिंतीवर आदळतो, माणसाच्या मनाचा आवाज होतो आणि आपल्याला अंतर्मुख करतो.

राजकुमार उदगांवे यांचा ‘गोफण’ हा संग्रह म्हणजे संवेदनशीलतेचा एक सुंदर आविष्कार आहे. शब्दांमधून ते फक्त कविता लिहीत नाहीत, तर एका पिढीचा, एका संघर्षशील मनाचा, आणि एका संवेदनशील व्यावसायिकाचा आवाज ऐकवतात. हे लेखन नुसते साहित्य नाही, ते मनाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या या दुसऱ्या संग्रहाच्या निमित्ताने नव्या वाटा उघडतील, असे वाटते. हेच कवी म्हणून त्यांच्या यशाचे गमक आहे.

हा कवितासंग्रह लवकरच dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा. 


Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले