'मी माझ्या भूमीच्या शोधात' - सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतिबिंब

'मी माझ्या भूमीच्या शोधात' - सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतिबिंब

'मी माझ्या भूमीच्या शोधात' हा जयराज खुने यांच्या कवितांचा संग्रह एक साधा काव्यप्रयोग नसून समाजाच्या विषम परिस्थितीतील विदारक सत्याचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा ज्वलंत दस्तऐवज आहे. हा कवितासंग्रह विस्थापितांनी समतेच्या दिशेने आरंभलेली एक शोधमोहीम आहे. या संग्रहातून मानवमुक्तीची दिशा आणि मानवी मूल्यांचा उद्घोष होतो. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून रुजलेली ही कविता सामाजिक विषमतेवर कठोर प्रहार करत न्याय, समता आणि बंधुतेचे महत्त्व अधोरेखित करते.

जयराज खुने यांच्या बालपणात कानावर पडणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भीमगीते, शाहिरी पोवाडे आणि सिनेगीते यांची अमिट छाप आहे. या सांस्कृतिक आविष्कारांमुळे त्यांच्या संवेदनशीलतेला एक वेगळा आयाम मिळाला. परंतु केवळ रसिकतेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कवितेत समाजातील दु:ख, वेदना आणि संघर्ष यांचे प्रतिबिंब दिसते.

१९९० पासून शिक्षणासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे कथालेखन थांबले असले तरी सामाजिक अन्यायाची जाणीव आणि अस्वस्थता त्यांच्या अंतर्मनात कायम होती. अमानवी घटनांनी चिंतनाला प्रवृत्त करणाऱ्या खुने यांना कवितेतून अभिव्यक्तीचा मार्ग गवसला. त्यांच्या कवितांचा आरंभ ‘माय’ या कवितेपासून झाला, जी 'आर्त' या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली आणि वाचकांच्या पसंतीस उतरण्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.

खुने यांच्या कवितांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे भान प्रकर्षाने जाणवते. बौद्ध विचारधारेचा प्रभाव त्यांच्या चिंतनावर ठळकपणे दिसतो. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा आधार घेत त्यांनी अनेक विद्रोही आणि आशावादी कविता लिहिल्या आहेत.

त्यांच्या कवितांमधून जातीय विषमता, आर्थिक शोषण, अज्ञान आणि अन्याय यांचा तीव्र निषेध होतो.

"वर्णभेद सारे, मनूची पैदास
वैदिकांची आस पूर्तीसाठी."

या ओळींमधून त्यांनी धर्मग्रंथ आणि पुरोहितशाहीच्या भूमिकेवर कठोर प्रहार केला आहे. हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला गुलामगिरीत ठेवणाऱ्या व्यवस्थेचे ते निर्भीडपणे वर्णन करतात.

खुने यांच्या कवितेत व्यक्त होणारा विद्रोह हा केवळ निषेधापुरता मर्यादित नाही. तर तो नव्या समाजव्यवस्थेचा आग्रह धरतो. मानवी मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांच्या कवितेतून एक सकारात्मक स्फोटकता जाणवते.

"माझा शब्द!
पिळवटलेल्या आतड्यातला, दडपलेल्या काळजातला
एक हुंकार… प्रज्ञासूर्याच्या प्रक्रियेनं झाला मुक्त."

या ओळींतून एक आश्वासक विद्रोह व्यक्त होतो. त्यांचा शब्द हा दडपलेल्या वर्गाचा हुंकार आहे, जो नव्या क्रांतीचे बीज पेरतो.

दलित साहित्य आणि आंबेडकरी चळवळ हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. आंबेडकरी प्रेरणेने जन्म घेतलेली दलित कविता ही मानवी विषमतेचा प्रतिकार करते आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा आग्रह धरते. खुने यांच्या कवितेनेही हेच कार्य केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षातून मिळालेल्या ज्ञानाबद्दल खुने आभार व्यक्त करतात. खुने यांच्या कवितेत भविष्याचा आशावाद स्पष्ट दिसतो.

"या माळरानाच्या उरावर उमटविलेल्या पाऊल ठशात प्रज्ञेचं बी डोबणार आहे,
शीलाचं पाणी आणि करूणेचं खत घालून हे माळरान फुलवणार आहे."

ही ओळ केवळ सर्जनशीलता व्यक्त करत नाही तर सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा दर्शवते.

खुने यांच्या कवितेतील आशय आजच्या काळाशी सुसंगत आहे. वाढती सामाजिक विषमता, संविधानिक मूल्यांना येणारे धोके यावर त्यांची कविता प्रकाश टाकते.

अलिकडच्या काळात दलित साहित्य आवर्तात अडकले असल्याची टीका होते, मात्र खुने यांच्या कवितेत आशयाची खोली आणि प्रखरता यामुळे ती विद्रोही साहित्याचा भाग ठरते.

'मी माझ्या भूमीच्या शोधात' हा संग्रह प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असलेल्या लढ्याचा प्रतीक आहे. विस्थापितांचे योगदान, त्यांच्या संघर्षाची गाथा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा उद्घोष या संग्रहातून होतो.

या संग्रहात कवीने मानवी मुक्तीचे स्वप्न साकारले आहे. ही कविता केवळ एक साहित्यिक मांडणी नसून मानवी मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जयराज खुने यांचा 'मी माझ्या भूमीच्या शोधात' हा कवितासंग्रह केवळ कवितांचा संग्रह नाही तर सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतिबिंब आहे. कवीच्या प्रखर सामाजिक जाणिवा, विद्रोही भावना आणि नव्या जगाच्या निर्मितीचा आशावाद या संग्रहाला एका वेगळ्या उंचीवर नेतो.

कवितेच्या माध्यमातून त्यांनी मानवी संघर्ष आणि मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचा केलेला प्रयत्न साहित्यविश्वात नक्कीच मोलाचा ठरेल. त्यांच्या काव्यप्रवासाला शुभेच्छा!

हा कवितासंग्रह dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे. अवश्य वाचा. 

-दिलीप भोसले
सीईओ दिभो सन्स
भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक
सक्षम फिल्म कंपनी
संपर्क📲 9370239533

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले