'माझ्या मनातले निखारे' - वास्तववादी कवितांचा आत्मसंवाद

'माझ्या मनातले निखारे' – वास्तववादी कवितांचा आत्मसंवाद

कविता ही फक्त भावनेची अभिव्यक्ती नसून ती जीवनाचा आरसा देखील असते. जीवनातील चढउतार, सामाजिक संघर्ष, शोषण, अन्याय तसेच प्रेम, माया आणि आत्मविश्वास यांची साक्ष देणारा काव्यप्रकार ही कविता असते. ‘माझ्या मनातले निखारे’ हा विद्या राजेंद्र मोरे यांच्या कवितांचा संग्रह त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाचा, अनुभवांचा आणि संघर्षाचा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.

विद्या मोरे यांच्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात साधीशी असली तरी ती संघर्षमय जीवनाच्या अनुभवांनी फुलली आहे. त्यांच्या घरात शिक्षणाला फारसा वाव नसला तरी लेखनाची आवड लहानपणापासून होती. 2012 मध्ये फेसबुकवर त्यांनी पहिली कविता पोस्ट केली तेव्हा त्यांच्या कवितांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कविता वास्तववादी असून जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत.

कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या प्रभावाखाली विद्या मोरे यांनी विद्रोहाच्या छटांनी नटलेल्या कविता लिहिल्या. नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे समाजशास्त्रीय दर्शन त्यांच्या लेखणीला दिशा देणारे ठरले. त्यामुळे त्यांच्या कवितांतून शेतकरी, महिला कामगार, वंचित समाज यांचे दु:ख आणि संघर्ष अधोरेखित होतात.

विद्या मोरे यांचे वैयक्तिक जीवन संघर्षमय राहिले आहे. पतीचे अकाली निधन, मुलांना वाढवण्याची जबाबदारी आणि एकाच वेळी आई व बाप होण्याचे अवघड जीवन त्यांनी यशस्वीपणे पेलले. त्यांच्या या कर्तृत्वाला कुटुंबाचा खंबीर आधार लाभला. विशेषतः मुलं घोषल, हर्षल, सून यामिनी आणि नातू क्रितांश यांचं अस्तित्व त्यांच्या जीवनाचा आधार ठरलं.

संघर्षातून आलेल्या अनुभवांनी त्यांची कवितेतील जाण अधिक प्रगल्भ केली. बौद्ध, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पालन करणाऱ्या विद्याताई मोरे यांच्या कवितांतून समाजातील कर्मकांड, जातीभेद, धर्मांधता आणि अन्यायाविरुद्ध प्रखर प्रहार पाहायला मिळतात.

‘माझ्या मनातले निखारे’ या कवितासंग्रहातील कविता व्यवस्थेविरुद्धचा एल्गार म्हणून समोर येतात. सामाजिक विषमता, स्त्रीशोषण, शेतकऱ्यांच्या समस्या, धार्मिक रूढी आणि कर्मकांड यांवर कठोर टीका करणाऱ्या त्यांच्या कवितांना प्रचंड भावनिक ताकद आहे.

“पावसा ये ना जरा” या कवितेत विद्याताई शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतात. शेतीसाठी हवामानाची प्रतिकूलता, कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांचा संघर्ष त्यांच्या कवितांमधून स्पष्ट होतो.

‘व्यथा स्री ची’ या कवितेत त्यांनी स्त्रीच्या संघर्षमय जीवनाचे मार्मिक चित्रण केले आहे. पतीचे निधन आणि त्यानंतरच्या जीवनातील एकाकीपणाचा अनुभव त्यांनी ‘आठवण’ कवितेतून व्यक्त केला आहे.

‘शिकलो आम्ही महिला’ या कवितेत शिक्षणाच्या अभावामुळे महिलांवर झालेल्या अन्यायाची मांडणी आहे. धार्मिक कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला शिक्षणाच्या महत्त्वाचे भान या कवितेतून दिले आहे.

‘जात नाही ती जात’ या कवितेत त्यांनी जातीयतेच्या राजकारणावर प्रखर टीका केली आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंना वंदन करणाऱ्या ‘क्रांतीसूर्य’ या कवितेत सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

‘नाही घाबरत कुठेही’ या कवितेत आत्मविश्वासाची भावना जागवली आहे. आपल्या लाडक्या व्यक्तीने दिलेल्या आदर्श वाटेवर चालण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते.

विद्या मोरे यांच्या कवितांची भाषा साधी, सरळ आणि प्रभावी आहे. त्यांच्या लेखनात मुक्तछंदाचा अधिक प्रभाव दिसतो. काही कवितांत गझलनुमा शैलीचा वापर करून त्यांनी दुःख आणि आठवणींच्या गहिऱ्या छटा रेखाटल्या आहेत.

त्यांच्या कवितांतील काही ओळी मनाला चटका लावतात:

“हे दुःखानो आठवणीत किती राहणार आता,
श्वास गुदमरतोय हुंदके हुंदके देऊन आता...”
या ओळी दुःखाला शब्दबद्ध करण्याची त्यांची ताकद दर्शवतात.

‘माझ्या मनातले निखारे’ हा विद्या मोरे यांच्या काव्यप्रवासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या कवितासंग्रहात त्यांनी वास्तव, संघर्ष, प्रेम आणि आत्मशक्तीचे सुरेख मिश्रण साकारले आहे. त्यांच्या काव्यलेखनातून वाचकांना जीवनाचे वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळतात. त्यामुळे या काव्यसंग्रहासाठी विद्या मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

हा काव्यसंग्रह dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती वाचकांसाठी उपलब्ध आहे. अवश्य वाचा. 

-दिलीप भोसले
सीईओ दिभो सन्स
भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक
सक्षम फिल्म कंपनी
संपर्क 📲 9370239533

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले