'बुद्ध धम्म' - सामाजिक क्रांतीचे आणि मानव मुक्तीचे अधिष्ठान
'बुद्ध धम्म' – सामाजिक क्रांतीचे आणि मानवमुक्तीचे अधिष्ठान... भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक धर्म, विचारप्रणाल्या आणि तत्त्वज्ञान निर्माण झाले. परंतु ज्याने संपूर्ण समाजव्यवस्थेचा पाया हादरवला, जो केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांतीचा धगधगता ज्वालामुखी ठरला, अशी एकमेव चळवळ म्हणजे बुद्ध धम्म. डी. एल. कांबळे यांच्या ‘बुद्ध धम्म – एक महान क्रांती’ या पुस्तकात हाच मूलगामी विचार अभ्यासपूर्ण आणि निर्भीड शैलीत मांडला आहे. बुद्ध धम्म ही केवळ कोणाची अध्यात्मिक किंवा धार्मिक श्रद्धा नाही; ती तर एका विषारी सामाजिक रचनेविरुद्धची असंतोषाने पेटलेली आंतरिक ज्वाला आहे. तथागत बुद्धांनी धर्माचा अर्थच नव्याने परिभाषित केला. जे मानवाचे कल्याण करते, जे मुक्तीकडे नेते आणि जे कृतीवर आधारित आहे, तेच खरे ‘धम्म’. यामुळे बुद्ध धम्म ही श्रद्धेवर नाही, तर समजुतीवर आधारित क्रांती ठरते. जिथे जन्मावरून माणसाची जात ठरवली जात होती, तिथे बुद्ध म्हणतात – “जात जन्मावरून नव्हे, कर्मावरून ठरते.” हे वाक्य म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला थेट आव्हान होते. म्हणूनच कांबळे स...