'काहूर' :- माणदेशाच्या मातीतील शब्दांची साद

'काहूर' :- माणदेशाच्या मातीतील शब्दांची साद

शब्द म्हणजे फक्त अक्षरांचा संग्रह नसतो. ते असतात अंतःकरणातील ध्वनी. काही ध्वनी हलकेसे काळजात घुसतात, तर काही उभ्या आयुष्याचा आरसा बनतात. मोहन गोपाळ घाडगे यांचा ‘काहूर’ हा कथासंग्रह म्हणजे अस्सल माणदेशी जीवनाचा असा आरसा आहे, जिथं पाणीटंचाई, अंधश्रद्धा, प्रेम, संघर्ष, शिक्षण, आणि मानवी भावभावना यांचं प्रखर चित्रण झालेलं आहे.

'काहूर' हा शब्दच जणू हाक घालतो. गावच्या शिवारातून, चिखलाच्या वाटांमधून, खळखळणाऱ्या ओढ्यातून आणि तळमळत्या मनातून. लेखकाच्या लेखणीतून उमटलेला हा 'काहूर' म्हणजे ग्रामीण जीवनाच्या व्यथा-वेदनांचा हुंकार आहे.

घाडगे सर हे स्वकर्तृत्वावर ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना शाळेच्या पटांगणापासून, गावकऱ्यांच्या बोलण्या-वागण्यातून आणि मुलांच्या डोळ्यांतून अनेक कथा दिसत गेल्या. ते अनुभव, निरीक्षणं, विचार यांचं बीज त्यांनी काळजीपूर्वक मनात पेरलं आणि त्यातून साकार झाल्या ‘काहूर’ मधील पंधरा कथा.

या कथा वाचताना लेखकाने केवळ पाहिलेलं नाही, तर ‘अनुभवलं’ आहे हे ठळकपणे जाणवतं. जसं की ‘सरकारी विहीर’ ही कथा. केवळ एका सरकारी योजनेंच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार आणि ग्रामीण जनतेची होरपळ याचं हृदयद्रावक चित्रण या कथेत आहे. ‘फरार’, ‘सार्थक’, ‘परतफेड’ अशा कथा वास्तवाचे चटके देणाऱ्या आहेत, तर ‘काहूर’ ही शीर्षक कथा जणू पूर्ण संग्रहाचा आत्मा आहे.

कथांमधील पात्रं जसं की जर्सी, चुचुंद्री, भैरू, गीताबाई ही कुठल्याही काल्पनिक अवकाशातील नाहीत. तर ती आहेत माणदेशातील मातीतील. पाणवठ्यावर भेटणारी, वाड्याच्या दारात बैलांना चारा घालताना गप्पा मारणारी, पोतराजाच्या मागे धावणारी, आणि शाळेच्या पटांगणात उज्वल भविष्याची स्वप्न पाहणारी.

त्यांची भाषा ही स्वाभाविक आणि माणदेशी आहे. संवादात 'ते' व्यक्त होतात. त्यांच्या व्यथा, त्यांच्या श्रद्धा आणि त्यांचा संताप. ग्रामीण ढंगातील ही भाषाशैली वाचकाला त्या गावाच्या मध्ये नेऊन ठेवते. लेखकाचा ग्रामीण संवादांचा हातखंडा या कथासंग्रहाला अधिक अस्सल बनवतो.

'काहूर' या संग्रहात ग्रामीण जीवनातल्या समस्यांचा वेध घेताना लेखक शिक्षणव्यवस्थेतील अनियमितता, प्रशासकीय भ्रष्टाचार, स्त्रियांची दुर्दशा आणि अंधश्रद्धेचा अंधार यावरही रोखठोक भाष्य करतात.

घाडगे सरांचं बालपण माणदेशात गेलं, आणि हेच त्यांचं लिखाण समृद्ध करतं. ग्रामीण भागात वाढलेलं मूल, जेव्हा शहरात मराठी साहित्याच्या सहवासात आलं, तेव्हा त्याच्या लेखणीला नवी दिशा मिळाली. व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, बंधू माधव यांची पुस्तकं वाचत असताना त्यांना स्वतःच्या गावात, माणसांत, आणि त्यांच्या आयुष्यात कथा दिसायला लागल्या. त्याच प्रेरणांमधून ‘सत्कार’ आणि आता ‘काहूर’ हा दुसरा संग्रह साकारला गेला आहे. ‘सत्कार’ ला मिळालेला प्रतिसाद लेखकाला नव्या लेखनासाठी बळ देऊन गेला.

 “अंधश्रद्धा, पावसाचं लहरीपण, त्यामुळे आमचं विस्कटलेलं जीवन पाहून डोकं सुन्न व्हायचं, पण काही करता न आल्याचं दुःख ही व्हायचं... आणि ती अंतःकरणाची घालमेल व्यक्त करण्यासाठी शब्द धावून यायचे” हे त्यांच्या लेखनाचा गाभा स्पष्ट करते. लेखकाने लिहिलेलं हे वाक्य त्यांच्या कथालेखनाची अंतःप्रेरणा आहे. 

‘काहूर’ म्हणजे ग्रामीण जीवनाची तपश्चर्या. हा केवळ कथासंग्रह नाही, तर एका लेखकाच्या अनुभवांची, नोंदींची आणि अंतःकरणाच्या अस्वस्थतेची अभिव्यक्ती आहे. मोहन गोपाळ घाडगे यांच्या लेखणीतून ग्रामीण भारताचं जे संवेदनशील चित्रण या संग्रहात पाहायला मिळतं, ते आजच्या काळात फारच मौल्यवान आहे.

हा संग्रह वाचताना माणदेशातील मातीचा गंध, माणसांची धडपड, नात्यांची गुंतागुंत आणि आशेचा हलकासा किरणही आपल्याला स्पर्शून जातो. ‘काहूर’ ही केवळ शब्दांची साद नाही, तर ती माणसांच्या जिव्हाळ्याची, संवेदनांची, आणि अस्मितेची साक्ष आहे. 'काहूर' हे वाचनप्रेमींसाठी एक भावनिक आणि साहित्यिक अनुभव ठरेल, यात शंका नाही.

'काहूर' हा कथासंग्रह लवकरच येत आहे. dibho.com या आॅनलाईन ईबुक प्लॅटफॉर्म वरती अवश्य वाचा. 

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले