दलित मुक्तीच्या लढ्यातील दोन महामानवांचा वैचारिक संघर्ष : एक चिकित्सा

दलित मुक्तीच्या लढ्यातील दोन महामानवांचा वैचारिक संघर्ष : एक चिकित्सा

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या महान पर्वात दोन महामानवांचा ठसा कायमचा उमटलेला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोघांची गंतव्यस्थाने सामाजिक न्याय आणि मानवी स्वातंत्र्य होती, पण त्यांची वाटचाल वेगवेगळी होती. हाच मूलभूत वैचारिक संघर्ष डॉ. आय. पी. कोकणे यांनी त्यांच्या संशोधन ग्रंथात अत्यंत चिकित्सक आणि तितक्याच भावनिक संवेदनशीलतेने उलगडून दाखवला आहे.

हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींच्या विचारांचा नव्हता, तर तो दोन दृष्टिकोनांचा होता. एक धर्म, परंपरा आणि मानसिक परिवर्तनाच्या आधारे समाजसुधारणेची भूमिका मांडणारा गांधींचा दृष्टिकोन आणि दुसरा संविधान, कायदा, समानता व राजकीय प्रतिनिधित्व यांवर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वास्तववादी दृष्टिकोन.

गांधीजींनी अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला, पण त्यांची पद्धत 'हरिजन सेवा' ही संज्ञा वापरून अस्पृश्यांना हिंदू समाजातच सामावून घेण्याची होती. ते सामाजिक परिवर्तनाच्या भावनिक आणि नैतिक मार्गावर विश्वास ठेवत होते. मात्र, ही भूमिका अस्पृश्य समाजाच्या मुळ पीडेला स्पर्श करत नव्हती. कारण अस्पृश्यतेचा चटका गांधींनी अनुभवला नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र त्याच्या भुक्तभोगी होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत ती वेदना झणझणत होती.

याच वेदनांमधून जन्माला आलेली त्यांची भूमिका होती. "स्वतंत्र ओळख, स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व आणि कायद्याद्वारे हक्क मिळवणं." म्हणूनच त्यांनी गोलमेज परिषदेच्या वेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी माझ्या दलित, मागासलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो." गांधींना ही भूमिका स्वीकारणं अशक्य होतं, कारण त्यांना वाटत होतं की, दलित हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहेत. हेच मतभेद पुढे पुणे कराराकडे नेणारे ठरले.

डॉ. कोकणे यांनी आपल्या ग्रंथात गोलमेज परिषद, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, पुणे करार, आणि गांधी-आंबेडकर संवाद यांचा ऐतिहासिक संदर्भासहित खोलवर अभ्यास केला आहे. पुणे करारावर सहमती दर्शवताना बाबासाहेबांनी दोन पावले मागे घेतली, ती त्यांच्या मनात गांधींविषयी असलेल्या सन्मानामुळेच. हे डॉ. कोकणे यांनी अत्यंत सूक्ष्मतेने उलगडलं आहे.

या संघर्षात एक अदृश्य स्पर्धाही होती. ‘अस्पृश्यांचा खरा प्रवक्ता कोण?’ गांधींनी आपली सहवेदना आणि नैतिक शक्ती वापरून समाज परिवर्तनाची भूमिका घेतली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, सत्ता आणि सक्षमीकरणावर भर दिला. गांधींनी पवित्रता आणि शुचिता मांडली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे मूल्यमंत्र दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ संविधान रचले नाही, तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वंचित घटकांसाठी सामाजिक न्यायाचा पाया घातला. गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानविद्येचा सन्मान ठेवून त्यांच्याकडे घटनासंहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले. हा इतिहासातला एक अत्यंत मोलाचा क्षण होता. जिथे संघर्ष असूनही समंजसतेने एका राष्ट्रहिताच्या बाजूने दोघांनीही झुकून मार्ग काढला.

गांधीजींना देशाच्या नैतिक पुनरुत्थानाची आवश्यकता वाटत होती, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व्यवस्थात्मक बदल हवा होता. गांधींनी देशासाठी प्राणपणाने लढा दिला, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान मिळवून दिला. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते  "राजकीय लोकशाही पुरेशी नाही, सामाजिक लोकशाहीही हवी."

डॉ. कोकणे यांच्या ग्रंथातून एक गोष्ट स्पष्ट होते ही तुलना नव्हे, ही एक समांतर यात्रा आहे. एकमेकांना पूरक, विरोधक असूनही देशाच्या समृद्ध भविष्यासाठी आवश्यक ठरलेले दोन महामानव. यामुळेच हा ग्रंथ केवळ अभ्यासकांसाठी नाही, तर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, आणि सामान्य वाचकांसाठीही मार्गदर्शक आहे.

हा ग्रंथ म्हणजे केवळ वैचारिक संघर्षाचं दस्तऐवजीकरण नाही, तर तो संघर्ष समाजपरिवर्तनासाठी किती आवश्यक असतो, हे समजावून देणारा एक प्रकाशस्तंभ आहे.

विचारांचा अचूक दस्तऐवज तयार केल्याबद्दल. डॉ. आय. पी. कोकणे यांना आभाळभर शुभेच्छा..!

हा ग्रंथ लवकरच dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा. 

Comments

Popular posts from this blog

'यसकर' - एका कडवट सत्याचा वेध..

'धम्मपद' - अंत:करणाला स्पर्श करणारा जीवनविवेक

पारंपरिक प्रकाशन आणि dibho.com ई-बुक प्लॅटफॉर्म - दिलीप भोसले