'साईड इफेक्ट्स' - स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अस्वस्थ करणारा प्रवास
'साईड इफेक्टस्' - स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अस्वस्थ करणारा प्रवास
स्त्रीच्या लैंगिकतेविषयी, तिच्या भावनिक ओढीविषयी आणि समाजाच्या स्त्रीविषयी असलेल्या दुटप्पी दृष्टिकोनाविषयी आजवर अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. पण जेव्हा ग्रामीण पार्श्वभूमीतील स्त्रियांचे विवाहबाह्य संबंध, त्यामागची मानसिकता आणि त्याचे दूरगामी परिणाम या साऱ्या गोष्टींचा तपशीलवार शोध घेतला जातो, तेव्हा 'साईड इफेक्टस्'सारखी कादंबरी जन्माला येते. लेखिका नीलम माणगावे यांची ही कादंबरी ग्रामीण स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याची किंमत काय असते, याचा वेध घेते. ही फक्त कथारूप कादंबरी नाही, तर स्त्री-पुरुष नातेसंबंध, लैंगिकता आणि सामाजिक मानसिकता यांवर चिंतन करायला लावणारा अभ्यासपूर्ण दस्तऐवज आहे.
नीलम माणगावे यांचा 'निर्भया लढते आहे' हा बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या कथा सांगणारा कथासंग्रह वाचकांसमोर आला तेव्हा त्याला विशेषतः पुरुष वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बलात्कार म्हणजे केवळ शारीरिक अत्याचार नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्तरावर स्त्रीचे पूर्णतः खच्चीकरण करणारी घटना आहे, हे त्या संग्रहाने प्रभावीपणे अधोरेखित केले. मात्र, 'साईड इफेक्टस्' कादंबरीत मांडलेला स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा मुद्दा वेगळ्या स्तरावरचा आहे. येथे स्त्रियांनी बलात्कार सहन केलेला नाही, तर स्वतःहून, स्वखुशीने परपुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. ही नैतिक-अनैतिकतेच्या पारंपरिक चौकटींना आव्हान देणारी गोष्ट आहे. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांच्या संदर्भात हा विषय अजूनही वर्ज्य मानला जातो. म्हणूनच, अशा स्त्रियांचे मानसिक आंदोलन, त्यांची कारणमीमांसा आणि त्यातून जन्माला येणारे 'साईड इफेक्टस्' या कादंबरीत प्रभावीपणे मांडले आहेत.
ही कादंबरी का लिहावीशी वाटली, याचे उत्तर लेखिकेने आपल्या निवेदनात दिले आहे. साधारणतः १५-२० वर्षांपूर्वीच्या दोन घटना त्यांना अस्वस्थ करून गेल्या. एका गावात महिलांनी त्यांच्या लैंगिक छळकर्त्याचा खून केला, तर दुसऱ्या गावात सुशिक्षित, उच्चभ्रू घरातील १५-२० स्त्रिया एका पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवत होत्या. या घटना ऐकून त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले. समाज स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य देण्यास तयार नाही, पण पुरुष मात्र कित्येक स्त्रियांशी संबंध ठेवूनही दोषमुक्त राहतो. हाच दुटप्पीपणा या कादंबरीत अधोरेखित केला आहे.
कादंबरीत विवाहसंस्थेच्या बंधनाबद्दल आणि त्यातील लैंगिक दडपणाबद्दलही सखोल मांडणी आहे. विवाहसंस्था ही केवळ समाजरचनेने निर्माण केलेली व्यवस्था आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा गाभा म्हणजे परस्पर विश्वास आणि शारीरिक समाधान. मात्र, प्रत्यक्षात पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीच्या लैंगिक गरजांकडे दूर्लक्षच केले जाते. विवाह हा केवळ कर्तव्यपूर्तीचा भाग बनतो, प्रेम किंवा शारीरिक तृप्ती नव्हे. पुरुषाच्या गरजा मात्र सतत महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित प्रेम, जिव्हाळा आणि लैंगिक समाधान मिळत नसेल, तर ती बाहेरचा मार्ग शोधते. पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवले, तर तो 'पुरुषसुलभ प्रवृत्ती' म्हणून स्वीकारला जातो, पण स्त्रीने तसे केले, तर ती 'अनैतिक' ठरते. याच सामाजिक दुटप्पीपणावर 'साईड इफेक्टस्' कडाडून प्रहार करते.
या कादंबरीतील स्त्रिया ग्रामीण आहेत, पण त्यांची मानसिकता आणि त्यांचे प्रश्न वैश्विक आहेत. स्त्री ही फक्त पुनरुत्पादनासाठी जन्मलेली नाही, तिचीही काही स्वप्ने आहेत, भावना आहेत, गरजा आहेत, हे अजूनही समाजाने स्वीकारलेले नाही. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन यामुळे महिलांनी आपल्या भाकरीचा प्रश्न सोडवला आहे, पण अजूनही त्या मानसिक आणि शारीरिक समाधानाच्या शोधात आहेत. त्यांच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची उणीव आहे. त्यामुळेच त्या विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. पण या संबंधांचे परिणाम केवळ त्या स्त्रियांनाच भोगावे लागतात, संपूर्ण गावालाही त्याचे चटके बसतात. म्हणूनच, 'साईड इफेक्टस्' ही केवळ वैयक्तिक नातेसंबंधांची कथा नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी कादंबरी आहे.
कादंबरीतील पुरुष पात्रे ही स्त्रियांकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहणारी आहेत. समाजाने त्यांना हे स्वातंत्र्य दिले आहे. पण जेव्हा स्त्रिया आपल्या इच्छेने निर्णय घेऊ लागतात, तेव्हा त्यांना अनैतिक ठरवले जाते. पुरुषाला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मूकसंमती मिळते, पण स्त्रीला मात्र समाजाकडून कठोर शिक्षा मिळते. स्त्रीने आपल्या गरजा पूर्ण करणे हा गुन्हा मानला जातो. ही मानसिकता बदलण्याची गरज 'साईड इफेक्टस्' अधोरेखित करते.
ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरची असली, तरी तिच्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. विवाहसंस्थेचे खोटे आदर्श, स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना आणि लैंगिकतेच्या नैतिकतेविषयीचे प्रश्न या सर्वांवर ही कादंबरी भाष्य करते. लेखिकेने हा विषय उचलून ग्रामीण महिलांच्या जीवनातील सच्चेपणासह मांडला आहे. त्यांच्या भावना, त्यांची दु:खे आणि त्यांचे निर्णय यांवर कोणतीही नैतिक शिक्षा न लादता, फक्त सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही केवळ एक कादंबरी राहात नाही, तर एक समाजभान निर्माण करणारा आरसा ठरते.
स्त्री ही फक्त बंधनांनी झाकलेली, पुरुषासाठीच जगणारी व्यक्ती नसून, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, हे समाजाने मान्य करण्याची वेळ आली आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रियांच्या लैंगिक इच्छांची उपेक्षा केली जाते, आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि सामाजिक आयुष्यावर होतो. 'साईड इफेक्टस्' ही कादंबरी हा विचार अधिक प्रभावीपणे मांडते. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी खुलेपणाने चर्चा होण्याची गरज आहे. समाजाने पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान संधी आणि न्याय द्यायला हवा. ही कादंबरी ही जाणीव निर्माण करणारा एक ठोस प्रयत्न आहे.
ग्रंथाली प्रकाशनाने अशा धाडसी आणि समर्पक विषयावर प्रकाश टाकणाऱ्या कादंबरीला स्थान दिले, यासाठी त्यांचेही कौतुक करावे लागेल. नीलम माणगावे यांच्या लेखणीने ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्याचा हा कटू, पण वास्तवदर्शी पट उलगडून दाखवला आहे. समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असलेल्या या कादंबरीचे स्वागत व्हायला हवे.
हि कादंबरी लवकरच dibho.com आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा.
Comments
Post a Comment